Friday, 23 October 2015

दशाननाची खंत_अभिषेक कांबळे...

दशाननाची खंत
अभिषेक कांबळे
नेहमीची खोपोली फास्ट लोकल चुकल्याने घर गाठण्यासाठी त्या मागची कर्जत स्लो पकडली. एक एक स्थानक घेत लोकल निघाली. त्यातच रोजच्याप्रमाणे मरत मरत सेवा देणाऱ्या 'मरे'ने त्या दिवशीही 'दररोज रखडणारी मरे त्याला कोण रडे' ही आपली उक्ती सार्थ ठरवली. गाडी लेट झाल्याने कसाबसा घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. उशीर झाल्याने आणि दिवसभराच्या दगदगीने अंथरुणावर पडल्यावर डोळ्याला डोळा कधी लागला कळलंच नाही. साखरझोपेत असताना अचानक राजवस्त्रे परिधान केलेला, दहा तोंडांचा, पल्लेदार मिशांचा, तापट चेहऱ्याचा लंकाधिपती रावण स्वप्नात आला. क्षणभर मला त्रेतायुगात गेल्यासारखं वाटलं. परंतु, टीव्हीवर रामायण सिरीयलमध्ये दिसलेलं रावणाचं ते अहंकारी रूप कुठेतरी हरवल्यासारखं वाटलं. हम लंकेश हैं, अहं ब्रह्मास्मि ही त्याची अहंकारी वाक्यं तो विसरल्यासारखा वाटला. त्याला सहज म्हटलं, ‘लंकाधिपती आपली ती वाक्यं आज ऐकू नाही आलीत.’ यावर तो दशानन अगतिक झाल्यासारखा ओक्साबोक्शी रडू लागला.
तो म्हणाला, उद्या दसरा आहे़  सबंध भारतवर्षामध्ये नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या रामलीलांची सांगता होणार. त्या सर्व ठिकाणी माझ्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाणार. माझे पुतळे जाळण्याबद्दल काही आक्षेप नाही, पण माझे पुतळे जाळणारे त्या योग्यतेचे आहेत का, हा प्रश्न मला अधिक सतावतो. रामाने मला युद्धात परास्त करून लंकेवर विजय मिळवला तो विजयादशमीचा उत्सव साजरा करणे काही गैर नाही. पण उत्सवात सहभागी होणाऱ्या व माझा पुतळा जाळणाऱ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे किती गुण घेतले? त्यांनी मला किंवा साक्षात श्रीरामाला किती जाणले, याचे आत्मपरीक्षण केले का? अशा कोणाच्याही हातून एक प्रकारे माझा प्रतिमेची होणारी विटंबना मला सहन होत नाही. रामाने माझा वध केला. माझा प्रिय अनुज बिभीषण मला सोडून रामाला सामील झाला किंवा माझे पुत्र अक्षकुमार आणि इंद्रजीत यांच्या मृत्यूने मला जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास मला दसऱ्याच्या दिवशी होतो. प्रभू रामाची कोणतीही नीती, त्यांचे गुण, त्यांचे औदार्य त्यांचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्यांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे माझा वध मर्यादा पुरुषोत्तमाने केला, पण साक्षात मर्यादा पुरुषोत्तमाच्या विचारांचा वध खुद्द त्याच्या अनुयायांनी केला, याचे मला अतीव दु:ख आहे.’
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दशानन म्हणाला,‘सध्या भारतीय राजनीती कोणत्या वळणावर जाऊन थांबेल याची काही शाश्वती नाही. कालपर्यंत गळ्यात गळे घालून मित्रपक्ष म्हणून मिरवणारे पक्ष उद्याचा निवडणुकीत दुसऱ्या पक्षाची मैत्री स्वीकारतात. आमच्या काळी असं नव्हतं. सुग्रीव आणि वालीच्या युद्धात श्रीरामाने वालीचा वध करून सुग्रीवला गादीवर बसवलं. त्याने रामाशी केलेली मैत्री माझा वध होऊन लंकाविजयापर्यंत निभावली. माझ्या पश्चात बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून अभिषेक करण्याचे औदार्य रामानं दाखवलं. मात्र आता रामाच्या नावाने राजकारण करणारा सत्ताधारी पक्ष सत्तेत वाटा असलेल्या मित्रपक्षाची मिळेल तशी गळचेपी करीत आहे़  सुरळीत राज्य कारभार करण्यासाठी मित्रपक्षाचा आवश्यक सन्मान राखून त्याला सत्तेत योग्य वाटा देण्याचे औदार्य सत्ताधारी दाखवत नाहीत़  विविध स्तरांवर आपल्या बगलबच्चांना नियुक्त करणे, सत्ताकेंद्र वाढवण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोट्यवधी रुपयांच्या पॅकेज देण्याच्या घोषणा केल्या जात आहेत़  सध्या गोवंश हत्याबंदीचा कायदा आणि गोमांस भक्षण करण्यावरून तर जणू देशव्यापी दंगल होते की काय, अशी परिस्थिती निर्माण केली जातेय का, असा प्रश्न पडतो़  अशाने रामराज्य येणार आहे का?’ असा उद्विग्न सवाल त्याने केला़
‘पूर्वी साधू-संतांना खूप महत्त्व होते़  त्यांचे उपदेश लोकांना चांगल्या मार्गावर नेऊन आपली आध्यात्मिक आणि ज्ञानाची उन्नती साधून निरोगी समाज घडवण्यासाठी खूप मोलाची भूमिका बजावत होते़  परंतु, आता संत-महंत, साध्वी म्हणवून घेणाऱ्यांनी तर कहरच केला आहे़  नुकत्याच नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू म्हणवून घेणाऱ्यांची उन्मादी वागणूक, त्यांचे  विविध बाबींमुळे त्यांच्यात झालेल्या वादाच्या घटना, न्यायालयापर्यंत गेलेले वाद, संत, माँ म्हणवून घेणाऱ्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार, कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार आदी प्रकारांमुळे मन विषण्ण होते़  असले संत समाजाला काय बोध देतात, मानवासमोर कोणता आदर्श ठेवतात, याचा विचार ते कधी करणार आहेत का,’ असे रावणराज म्हणाला़ 
'मी सीतेचे हरण करून लंकेला नेले़  परंतु, सीता माझ्या बंदिवासात असताना मी तिच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नाही़  सोन्याची लंका म्हणून त्रिलोकात नाव गाजत असलेल्या सुजलाम सुफलाम राज्याचा अधिपती असूनही सीतेवर अत्याचार करण्याचा विचार माझ्या मनाला शिवला नाही़  परंतु, आता काय चालले आहे़  संत म्हणवून घेणाऱ्यांकडून मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. मग यांना आपल्या प्रवचन-कीर्तने, रामलीलांमधून मला दूषणे देण्याचा काय अधिकार आहे? घरात वडील, भाऊ अन्य आप्तेष्टांकडून मुलींवर बलात्कार होत आहेत़  महागाई, भ्रष्टाचाराने सामान्य माणूस पिचलेला आहे़  दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावरही राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचे असंवेदशील काम राजकारण्यांकडून घडत आहे़  दोन धर्मांमध्ये प्रचंड तेढ निर्माण झाली. हे सर्व होत असताना तुमची पिढी बिनघोर झोपली आहे़  तुम्ही केवळ तुमच्या आभासी सोशल मीडियावर मश्गूल आहात़  या सर्व प्रकारांना पायबंद घालण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे प्रयत्नदेखील तुमच्याकडून होताना दिसत नाहीत़  सोशल मीडियावर 'लाइक' आणि 'फॉरवर्ड' मध्ये गुरफटलेले तुम्ही कोणताही सारासार विचार न करता विविध प्रकारचे वादंग निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून समाजातील वातावरण आणखी गढूळ करण्याचे काम करत आहात़  मग तुमचे नेते, राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांसह तुमच्या पिढीला माझे पुतळे जाळण्याचा काय नैतिक अधिकार आहे?’
दशाननाचा हा प्रश्न मनाला अंतर्मुख करून गेला़  या सर्व संवादांमध्ये कधी सकाळ झाली हे कळलंदेखील नाही़